न्युज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. १४ डिसेंबर २०२४) :- श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विचारांचा दीपोत्सव करणाऱ्या सृजनदीप व्याख्यानमालेचे शुक्रवार, दि. १३ नोव्हे. ते रविवार दि. १५ नोव्हे. २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या विचारअमृतातून विद्यार्थी-पालक-शिक्षक व समाज यांचे प्रबोधन घडावे… एक सुजाण पालक घडावा… येथील कोवळ्या मनांना संस्कार मिळावा… यातून एक सुंदर माणूस घडावा… याच मनस्वी भावनेतून गेली तीन वर्षं या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते.
या तिसऱ्या वर्षीच्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प शुक्रवार, दि. १३ नोव्हे. २०२४ रोजी इतिहासाचे गाढे अभ्यासक, विचारवंत मा. नितीन बानुगडे पाटील हे ‘प्रतापगडचा रणसंग्राम’ या विषयातून गुंफणार असून सासवड येथील वाघिरे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आर. एम. मिसाळ हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. शिवनिश्चल ट्रस्टचे संस्थापक मा. यशवंत गोसावी, श्रीक्षेत्र देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे, देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मा. सौ. पूजाताई दिवटे यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.
शनिवार दि. १४ नोव्हे. २०२४ रोजी ‘मुलांचे पालक व्हा… मालक नको’ या विषयातून प्रबोधन करित लोकराजा शाहू ॲकॅडमीचे अध्यक्ष मा.युवराज पाटील हे या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफणार आहेत. सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा. चंद्रकांत काटे हे यावेळी अध्यक्षस्थान भूषवतील. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त ह.भ.प. शिवाजीमहाराज मोरे, देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी मा.सौ. निवेदिता घार्गे, श्रीक्षेत्र देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव हे सन्माननीय अतिथी असतील.
रविवार, दि. १५ नोव्हे. २०२४ रोजी संत साहित्याचे गाढे अभ्यासक मा. सचिन पवार हे ‘फुले, शाहू, आंबेडकरांचे योगदान’ या विषयातून प्रबोधन करीत या व्याख्यानमालेचा समारोप करणार असून मावळ पंचायत समितीचे माजी सभापती मा.निवृत्तीभाऊ शेटे हे अध्यक्षस्थानी असतील. गोडूब्रे येथील वि.का.स. सोसायटीचे माजी चेअरमन मा. दत्तात्रय सावंत, इंद्रायणी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मा. तुकाराम (बाबा) गवारे, पिंपरी चिंचवड व्याख्यानमालेचे समन्वय समितीचे अध्यक्ष मा. राजाभाऊ गोलांडे यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.
सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दरवर्षी दिवाळी मेळ्याचे आयोजन केले जाते. विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, कल्पनात्मक व मनोरंजनात्मक खेळ, मुलांनी रंगविलेल्या पणत्या, आकाशकंदील, तोरणं, रांगोळीचे स्टीकर्स, किल्ल्यांसाठी विविध प्रकारची मावळ्यांसह चित्रे, पूजेचे साहित्य, मेहंदी, टॅटू आदिंच्या विक्रीतून मिळविलेला नफा दरवर्षी सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेला दिला जातो. यावर्षी दिवाळी मेळ्यातून आलेली रक्कम अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या शिवनिश्चल ट्रस्टला देण्यात येणार असून व्याख्यानमालेच्या पहिल्याच दिवशी रु.५१,००० चा धनादेश शिवनिश्चल ट्रस्टचे संस्थापक मा. यशवंत गोसावी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. तरी सर्व पालकांनी व रसिक श्रोत्यांनी या सृजनदीप व्याख्यानमालेस बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, सचिव प्रा. विकास कंद व शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी केले आहे.
















