न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. १५ डिसेंबर २०२४) :- श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आयोजित सृजनदीप व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प आज लोकराजा शाहू महाराज ॲकॅडमीचे संस्थापक प्रा. युवराज पाटील यांच्या ओघवत्या व मार्मिक विवेचनातून ‘मुलांचे पालक व्हा… मालक नको’ या विषयावर संपन्न झाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, पालकत्वाला कोणतेही नियम नाहीत. आपल्या मुलांना जर मोठे करायचे असेल तर लहान होऊन त्यांच्या वयाचे होऊन त्यांच्यावर सातत्याने प्रयोग करत राहणं म्हणजे खरं पालकत्व. आपण मुलांचे मालक व्हायला जातो, मुलाने चप्पल, कपडे आपल्या आवडीची घालावित म्हणून ती आवड त्यांच्यावर लादतो पण, मुलाला काय आवडतं हे न विचारता उलट तुला काय कळतं? असे बोलून आपण त्यांच्यावरच शंका घेतो. मुलांना आपलं घर हे सुरक्षित वाटायला हवं. बाहेर जर त्याच्या कडून एखादी गोष्ट चुकली तर त्याने ती गोष्ट सर्वात आधी पालकांना सांगायला हवी. गोष्ट लपवण्यापेक्षा जेव्हा ती चूक सांगण्याची उत्सुकता मुलाच्या मनात निर्माण होईल तेव्हा आपण त्याचे पालक असू. बाहेर मित्र भरपूर भेटतील पण पालक म्हणून आपण एकटेच त्याच्यासोबत आहोत, हे विसरता कामा नये.
प्रेम, जिव्हाळा हाच खरा कुटुंबाचा पाया असतो. मुलांमधील संवेदनशीलता हरवत चालली आहे कारण पालक म्हणून आपण त्यांच्यासमोर दांभिक बनत चाललोय. मुलांचे भावविश्व एका ठराविक वयात तयार होते, त्यावेळी पालक म्हणून आपल्या सहवासात जर त्यांचे भावविश्व तयार झाले तर ते मूल ३१ डिसेंबर ला मित्रांसोबत बाहेर जाणार नाही. मुलांना लहान लहान जबाबदाऱ्या देऊन त्यांना जबाबदार बनविले पाहिजे.
मुलांच्या चारित्र्याचा विकास करणे म्हणजे त्याचा सर्वांगीण विकास होय. फक्त त्याच्या मार्कलिस्टला आलेली सूज म्हणजे गुणवत्ता नव्हे, हे ध्यानात घ्यावे लागेल. मुलाला स्वतः ची मते तयार करता यावी, त्यासाठी विचारप्रक्रिया सुरु व्हावी, श्रमप्रतिष्ठेचे मूल्य कळावे, शारीरिक विकास व्हावा, म्हणजे मुलांचे व्यक्तिमत्त्व नाही तर चारित्र्य घडेल.
जगातील ७ आश्चर्ये आपणांस माहीत आहेत पण पालक म्हणून आपल्या मुलांमध्ये असलेली आश्चर्ये म्हणजेच क्षमता आपणांस कळायला हव्यात. मुलांच्या मनातलं आपल्या मनापर्यंत पोहचणे म्हणजे पालकत्व. अशा ओघवत्या शैलीतून प्रा. युवराज पाटील यांनी विद्यार्थी, श्रोत्यांची दाद मिळवत पालकांचे प्रबोधन केले.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा.चंद्रकांत काटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच श्रीक्षेत्र देहू संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तममहाराज मोरे, देहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल कंद, उपाध्यक्ष अशोक कंद, सचिव प्रा. विकास कंद, शाळेच्या उपप्राचार्या शैलजा स्वामी, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सुबलक्ष्मी पाठक आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राखी विक्री उपक्रमातून आलेला नफा दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून दिला जातो. यावर्षी सर्वांगीण प्रगती विचारात घेऊन निवड समितीने इ. ४ थी,५ वी व ६ वी तील ६ विद्यार्थ्यांची या आर्थिक सहाय्यासाठी निवड केली. यामध्ये इ. चौथीतील मयंक बोत्रे, श्री जगताप, इ. पाचवीतील माहिया शेख, संध्या चौरसिया, इ. सहावी तील यशश्री सोनावणे व आदित्य वारे या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. ५००० चा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका विनिता कुलकर्णी तर आभारप्रदर्शन सौ. स्नेहल शिंदे यांनी केले.

















2 Comments
tlover tonet
Hi there! This post couldn’t be written any better! Reading through this post reminds me of my previous room mate! He always kept talking about this. I will forward this article to him. Pretty sure he will have a good read. Thank you for sharing!
Watch Serie A Online
Yeah bookmaking this wasn’t a risky determination outstanding post! .