- ‘महापालिकेमध्ये एकत्रित नको तर स्वबळावर निवडणूक लढवावी’..
- कार्यकर्त्यांकडून खासगीत कुजबुज.
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२४) :- विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीतील भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी दमदार कामगिरी करत यश मिळविले. मात्र, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीतील तीन प्रमुख पक्ष एकत्रित लढणार की स्वबळ अजमावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीमध्ये जागावाटपात तिढ़ा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या विधानसभा मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळविला. त्यामुळे महापालिकेसाठी महायुतीमधील इच्छुकांची संख्या मोठी असणार आहे. त्यातील अनेकांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली होती. अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले. यामुळे मतांचे विभाजन होऊन महायुतीच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता होती. मात्र, महापालिकेत सत्ता आल्यास महापौर, स्थायी समिती, शिक्षण समिती अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे देऊ असे आश्वासन देत त्यांचे बंड शमवण्यात महायुतीच्या वरिष्ठांना यश आले. त्या शब्दावर विश्वास ठेवून अनेकांनी तलवार म्यान करत दिलेली जबाबदारी पार पाडली. अनेकांनी जनसंपर्काची आणि कामाची चुणूक दाखवली.
आता, सरकार स्थापन झाल्यावर रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेतील इच्छुक तयारीला लागले आहेत. ही निवडणूक तिन्ही पक्षांनी एकत्रित लढवण्याचे ठरवले तर प्रत्येक प्रभागातून सर्वच पक्षातील इच्छुकांची संख्या मोठी असणार आहे. त्यामुळे एका पक्षाच्या इच्छुकाला उमेदवारी मिळाल्यास दुसऱ्या पक्षातील इच्छुक बंडखोरी करण्याची शक्यता आहे. बंडखोरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा फटका महायुतीला बसणार आहे. त्यामुळे पालिकेमध्ये एकत्रित नको तर स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत.
जागा वाटपाचे सूत्र कळीचा मुद्दा ठरणार आहे. अनेक दिवसांपासून महापालिका निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या दृष्ट्रीने बंडखोरी शमविणे अशक्य होणार आहे. कोणता प्रभाग कुणाच्या वाट्याला येतो, त्यावरच उमेदवारीची व लढतीची गणिते ठरणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे सध्याचे वातावरण महायुतीसाठी पोषक आहे. याचा फायदा घेत राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्यासाठी महायुतीतील वरिष्ठ नेते आग्रही आहेत, याला काही पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. त्यामुळे येत्या चार महिन्यांत महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
निर्णय वरिष्ठच घेणार म्हणे…
दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्रित लहणार की स्वबळावर याचा निर्णय पक्षांचे वरिष्ठ नेतेच घेणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी खासगीत स्पष्ट केले.

















1 Comments
Ricardo Santander
I really like forgathering utile information , this post has got me even more info! .