- जन अधिकार संघटनेची महापालिका आयुक्तांकडे मागणी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२४) :- पिंपरीतील यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सध्या सावळा गोंधळ सुरू आहे. गोरगरीब व मध्यमवर्गीयांसाठी वरदान लाभलेले हे रुग्णालय आता डॉक्टरांसाठी गल्ला भरू केंद्र ठरत आहे. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात उपचार न देता त्यांना भीती घालून हे डॉक्टर स्वतःच्या दवाखान्यात त्यांना भर्ती करण्यात धन्यता मानत आहेत. तिथे ट्रीटमेंट कशी उत्तम मिळेल? यासाठी या डॉक्टरांकडून मार्केटिंग केले जात असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत डॉक्टरांच्या वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्याबाबत कोणताच निर्णय घेतला जात नाही.
रुग्णालयात सध्या औषधांचा तुटवडा भासत आहे. येथील रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना खाजगी मेडिकलमधून औषध किंवा गोळ्या आणण्यास भाग पाडले जात आहे. शस्त्रक्रियांसाठी देखील दुजाभाव केला जात असल्याची रुग्णांची ओरड आहे. रुग्णाच्या आजारावर लवकर निदान व्हावे यासाठी तज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत न करता चक्क मोबाईलवर रिपोर्ट पाहून रुग्णावर उपचार होत आहेत. कारण विचारले असता एवढा मोठा डॉक्टर इतका वेळ देऊ शकत नाही, असे सांगितले जाते.
दुसरीकडे तज्ञ डॉक्टरांअभावी रुग्णांना शिकवू डॉक्टरांच्या स्वाधीन केले जात आहे. त्यामुळे योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णांना स्वतःचा प्राणही गमावू लागू शकतो. रात्री आठ नंतर सोनोग्राफी सेंटर बंद होते. त्यामुळे इमर्जन्सी असणाऱ्या रुग्णांवर एक्स-रेद्वारे उपचार केले जात आहेत. तज्ञ डॉक्टरांची वनवा असल्यामुळे आहेत ते डॉक्टर टिकवण्यात प्रशासन सध्या धन्यता मानत आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांचा जीव टांगणीला लागलेला आहे. या रुग्णांचा वाली कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत जन अधिकार संघटनेचे अध्यक्ष मजीद शेख यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनाद्वारे वायसीएम रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
















