न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ०९ जानेवारी २०२५) :- शिवतेजनगर,कोयनानगर,शरदनगर,पूर्णानगर,घरकुल आदी भागातील नागरिकांसाठी असलेल्या शिवाजी पार्क येथील उद्यानाची दुरावस्था झाली आहे. पालिकेच्या दुर्लक्षाने या उद्यानाचा बळी गेला असून, उद्यान पूर्वावस्थेत आणावे, अशी मागणी मा.स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.
या उद्यानामध्ये दरदिवशी हजारो नागरिक येऊन ओपन जिम आणि अन्य सुविधांचा लाभ घेतात.लहान मुले,वयस्कर नागरिक यांच्यासाठी हे उद्यान त्यांच्या दैनंदिन जीवनमानाचा अविभाज्य भाग असल्याने उद्यानाच्या दुरावस्थेने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने,दाद मागायची कुणाकडे?असा प्रश्न नागरिकांना पडला असून,पालिका प्रशासनाने या उद्यानाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांना दिसत असलेल्या समस्या पालिका प्रशासनाला का दिसत नाहीत आणि गेले अनेक महिने या उद्यानाच्या अशा झालेल्या पडझडीकडे पालिका प्रशासन मुकदर्शक बनून किती दिवस बघत राहणार आहे?अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. उद्यान हे नागरिकांच्या आरोग्य आणि जीवनाची संजीवनी आहे आणि ओपन जिम तसेच अन्य साहित्याची झालेली दुरावस्था यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी मा.स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.












