न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ०९ जानेवारी २०२५) :- राज्यात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास (एसईबीसी), इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे.
उमेदवारांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत प्रमाणपत्र सादर न केल्याने प्रवेश न झाल्यास त्यास उमेदवारच जबाबदार राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना यापूर्वी २२ जुलै आणि ५ सप्टेंबर रोजी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासासाठी सहा महिने मुदवाढ देण्यात आली होती. परंतु या कालावधीत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवार जातवैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत. त्यामुळे प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन आणखी एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
संबंधित तीन महिन्यांचा अधिकचा कालावधी एसईबीसी, ओबीसी प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित होऊन जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठीच राहील. हा कालावधी अंतिम असेल आणि त्यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. या अधिकच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या उमेदवारांचे प्रवेश होऊ न शकल्यास त्यास संबंधित उमेदवार जबाबदार राहतील, असे नमूद करण्यात आले आहे.












