न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जानेवारी २०२५) :- महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून रात्री घनकचरा संकलन करण्यासाठी घंटागाड्या सोडल्या जाणार आहेत. विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या मागणीनुसार ४१ घंटागाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी सांगितली.
शहरातून दररोज सुमारे १२०० टन कचरा संकलित केला जातो. त्यासाठी दररोज सकाळी कचरा गाड्या सोडल्या जातात. काही कुटुंबामध्ये दोघेही नोकरी करणारे आहेत. त्यांना गाडी दारात येऊनही कचरा टाकणे शक्य होत नाही. यामुळे रस्त्यावर कचरा टाकला जाऊ नये, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने रात्रीच्या कचरा गाड्या घरोघरी सोडण्याचे नियोजन केले आहे.
सर्वच क्षेत्रीय कार्यालयांकडून रात्री सोडण्यासाठी गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार गाड्या सोडल्या जातील, अशी माहिती आरोग्य विभागाचे अधिकारी गणेश देशपांडे यांनी सांगितली.
अ, ब, फ व ग क्षेत्रीय कार्यालयाकूडन ४, क क्षेत्रीय कार्यालयाकूडन १०, ड क्षेत्रीय कार्यालयाकूडन ७, ह क्षेत्रीय कार्यालयाकूडन ६ तर इ क्षेत्रीय कार्यालयाकूडन २ अशा एकूण ४१ गाड्यांची मागणी करण्यात आली आहे.












