न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०१९) :- पुणे व पिंपरी-चिंचवड दूध वितरक संघातर्फे सांगवी येथे ऑनलाइनद्वारे दूध विक्रीवर बंदी यावी, या मागणीसाठी दूध वितरक व विक्रेते यांची चर्चा कार्यक्रम झाला. यावेळी प्रशांत शितोळे, नगरसेवक रोहित काटे, गणेश जगताप, दूध विक्री प्रमुख सुधीर वेनके, पांडुरंग कौंदळकर, सचिन निवंगुणे, चिंतन शाह, रूपेश पुजारी, प्रणव देशमुख, राहुल बोरकर व परिसरातील दूध विक्रेते उपस्थित होते.
ऑनलाइन दूध विक्रेता कंपनीच्या प्रमुखांशी दूध वितरक संघ चर्चा करण्यास तयार असूनही कंपनीचे प्रमुख समोरासमोर चर्चेस न येता पोलिस स्टेशनमध्ये बोलवून संघ सभासदावर कायदेशीर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचाही यावेळी आरोप करण्यात आला. याविरोधात अन्न व पुरवठा विभाग प्रमुख, अन्न व दूध पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य व मुख्यमंत्री यांनाही दूध वितरक संघातर्फे निवेदन देणार असल्याची माहिती देण्यात आली.
सचिन निवंगुणे म्हणाले, सर्व दूध वितरकांनी एकीचे बळ दाखविण्याची वेळ आली आहे. ऑनलाइन कंपन्या दूध वितरक विक्रेता व उत्पादक यांची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत आहेत व त्याठिकाणी स्वत:चे स्थान बनवत आहेत. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात ग्राहकांना दिसणारा फायदा हा भविष्यातील मोठा धोका ठरणार आहे. औषध निमाण क्षेत्रातील औषधे ऑनलाइन विक्रीसाठी जशी बंद करण्यात आली. तशाच पध्दतीने दुध ऑनलाईन विक्रीवरही बंदी आणावी.
येत्या २५ मे रोजी व्यापारी दिनाच्या निमित्ताने पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचे दुध वितरक संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे.











