- ठोस विकासकामांचा अभाव; शासकीय भरीव अनुदानाची गरज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२५) :- देहू नगरपंचयतीने मंगळवारी (दि. १८) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा साडेचार लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पीय अंदाज पत्रकास १५ जानेवारी रोजी स्थायी समितीने मान्यता दिली होती. समितीच्या शिफारशीनुसार नगर पंचायतीच्या विशेष अर्थसंकल्पीय सभेमध्ये मान्यता देण्यात आली. हा अर्थसंकल्प ९७ कोटी ९९ लाख ६७ हजार ५४५ रुपयांचा जमा-खर्चाचा आहे. जमा व खर्चाचा विचार करता, देहू नगर पंचायतीस विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात अनुदानावर अवलंबून राहावे लागणार आहे; तसेच नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी नव्याने बदल करावे लागणार आहेत.
देहू नगर पंचायतीच्या सभागृहात झालेल्या या अर्थसंकल्पीय सभेस नगराध्यक्षा पूजा दिवटे, उपाध्यक्ष मयूर शिवशरण, मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, गटनेते योगेश परंडवाल, नगरसेवक योगेश काळोखे, आदित्य टिळेकर, नगरसेविका स्मिता चव्हाण, प्रियंका मोरे, ज्योती टिळेकर, रसिका काळोखे, पूनम काळोखे, पूजा काळोखे, कार्यालयीन अधीक्षक प्रियांका कदम, कर अधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, नगर अभियंता रामदास भांगे आदी अधिकारी उपस्थित होते.
मालमत्तांची चतुर्थ वार्षिक करआकारणी-सन २०२३-२४ ते सन २०२६-२७ करण्यात आली आहे. देहूनगर पंचयतीसाठी एकूण रक्कम रुपये ४३ कोटी खर्चाच्या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. देहू शहराचा विकास आराखडा पूर्ण करणे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सविस्तर घनकचरा प्रकल्प अहवाल तयार करून त्याची अंमलबजावणी करणे. दिव्यांग तसेच दुर्बल घटक कल्याण निधींची तरतूद. महिला व बालकांकरता स्वसंरक्षण, योगा, आरोग्य इत्यादींचे विशेष प्रशिक्षण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रकल्प अहवाल तयार करून अंमलबजावणी करणे. नदी संवर्धन व सुशोभीकरण अंतर्गत तरतूद. नवीन पाणीपुरवठा जलवाहिनी भरीव तरतूद. इंद्रायणी नदी घाट सुशोभीकरण प्रस्तावित करण्यात आली आहे.














