- माजी नगरसेवक, सामाजिक संस्थाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करा..
- आ. अमित गोरखे यांची मेट्रो महाव्यवस्थापकांसह पालिका आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड शहराचा मेट्रो आणि परिवहन विकास कसा असेल? याबाबत शहरातील माजी नगरसेवक, सामाजिक संस्था, सर्वपक्षीय प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना बैठक बोलावून माहिती द्या, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी मेट्रो महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर, मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत वाढती लोकसंख्या व अतिजलद शहरीकरणामुळे शहराच्या वाहतूक समस्येने गेल्या दोन दशकांत गंभीर रूप धारण केले आहे. पर्याय मार्ग म्हणून मेट्रो अस्तित्वात आली आहे. पुणे मेट्रो हा नागरी सार्वजनिक जलद परिवहन रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील पुणे व पिंपरी-चिंचवड या जुळ्या शहरांची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी राबवण्यात येत आहे.
खऱ्या अर्थाने हा प्रकल्प अत्यंत कौतुकास्पद आहे. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्था हद्दीमध्ये प्रशासक राजवट लागू झाल्यापासून माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. त्यामुळे मेट्रो महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर, मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी बैठकीचे आयोजन करून वाहतुक विकासाची दिशा स्पष्ट करावी, असे आ. गोरखे यांनी म्हटले आहे.










