- जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. १५ मार्च २०२५) :- श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा रविवारी (दि. १६) होणार असून श्री संत तुकाराम महाराज संस्थानकडून बीजोत्सव सोहळ्याचे कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहेत. बीज सोहळ्याच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून त्यांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी दिली.
मुख्य मंदिर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे उपस्थित होते. रविवारी तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षपूर्ती सांगता बीज सोहळा संपन्न होत आहे. त्यादिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असून जन्मस्थान व मुख्य मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते वैकुंठगमन मंदिर येथील कीर्तन स्थळावर येतील. त्याठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
बीज सोहळ्याच्या कामांची लगबग..
संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या अनुषंगाने देहूत येणाऱ्या भाविक, वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने अनेक कामे करण्यात आली आहेत, तर उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. नगरपंचायत हद्दीतील पथदिव्यांची दुरुस्ती करण्यात आली असून अतिरिक्त ७० पथदिवे बसविण्यात आले आहेत. शहरातील महत्वाच्या २८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. इतरही रस्ते, सुरक्षा, आरोग्य, पाणी विषयक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
- पहाटे ३ वा. काकड आरती
- पहाटे ४ वा. श्री पुजा, महापुजा, शीळा मंदीर महापुजा
- पहाटे ६ वा. वैकुंठस्थान तुकाराम महाराज महापुजा
- सकाळी १०.३० वा. वैकुंठ स्थान मंदिराकडे पालखी प्रस्थान
- सकाळी १० ते १२ वा. वैकुंठ सोहळा कीर्तन (देहूकर महाराज)
- दुपारी १२.३० वा. वैकुंठ स्थानहून पुन्हा मुख्य मंदिरात आगमन
- रविवारी रात्री व सोमवारी सकाळी दिंड्यांचे कीर्तन कार्यक्रम