न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०१९) :- विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना त्यांच्या आवडीचा विषय निवडता आला पाहिजे. अभ्यासक्रम व विषय निवडीचे स्वातंत्र्य शैक्षणिक स्वायत्तेतून देणे शक्य आहे. जागतिक मुक्त बाजारपेठेत स्पर्धेत टिकण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. असे मनुष्यबळ शैक्षणिक स्वायत्तेतून वेगाने निर्माण होईल व त्यामुळे देशाचा विकास होईल, असे प्रतिपादन नवी दिल्लीतील राष्ट्रीय मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाचे (नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रीडिएशन – एनबीए) अध्यक्ष डॉ. के. के. अगरवाल यांनी केले.
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या (जेएसपीएम) राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात (आरएससीओई) डॉ. अगरवाल यांच्या हस्ते ‘‘शैक्षणिक स्वायत्तता अर्थात ॲकॅडमिक ऑटोनॉमी’’ अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उद्योजक श्रीकृष्ण हरहरे, ताथवडे संकुल जेएसपीएमचे संचालक डॉ. रवी जोशी, पी.जी. प्रोग्राम संचालिका डॉ. मनीमाला पुरी, जेएसपीएमचे संचालक अनिल भोसले, डॉ. पी. पी. विटकर, कार्यकारी संचालक प्रा. सुधीर भिलारे, संचालक रवी सावंत, जेएसपीएम वाघोली संकुल संचालक विजय सावंत, प्राचार्य डॉ. आर. के. जैन आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना डॉ. अगरवाल म्हणाले की, आज सर्व प्रगत देशात महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायत्तता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे अभ्यासक्रम निवडता येतो. हा अभ्यासक्रम उद्योग व्यवसायाची गरज विचारात घेऊन अद्ययावत ठेवण्यात येतो. असा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय, उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरतो. आगामी काळात उद्योगात ४.० या प्रमाणेच शिक्षणातही ४.० ही संकल्पना येणार आहे. आज बहुतेकजण मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही या तीन स्क्रिनसमोर आपला बहुतांश वेळ घालवतात. त्या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात योग्य पद्धतीने समावेश करून घेतल्यास त्यांना शिक्षणामध्ये आवड निर्माण होईल. हे तंत्रज्ञान देशातील ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात पोहोचविण्यासाठी सरकारबरोबरच सामाजिक संस्था व उद्योजकांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असेही डॉ. अगरवाल यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. आर. के. जैन प्रास्ताविकात म्हणाले की, पिंपरी चिंचवड परिसरातील महाविद्यालयांमध्ये सर्व प्रथम शैक्षणिक स्वायत्तता मिळण्याचा मान जेएसपीएमच्या राजर्षी शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयाला (आरएससीओई) मिळाला आहे. जेएसपीएमचे संस्थापक अध्यक्ष व जलसंधारण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयाचे व्यवस्थापन एक वर्षापासून त्यासाठी तयारी करीत होते. आता महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी उद्योग व्यवसायांची गरज विचारात घेऊन अद्ययावत अभ्यासक्रम अंमलात आणणार आहेत. वही, पेन ऐवजी, प्रोजेक्टर आणि औद्योगिक आस्थापनातील प्रशिक्षणावर आधारित शिक्षण मिळेल. तसेच विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विषय निवडीचे स्वातंत्र्य राहणार आहे. त्यावर गुण दिले जातील. विद्यार्थ्यांची आवड आणि कौशल्यावर आधारित विषय तो पुढील वर्षी निवडु शकतो. तसेच विद्यार्थ्यांना जर्मन, जपानी आणि फ्रेंच भाषा शिकण्याची संधी देण्यात आली आहे. उत्तीर्ण विध्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडुन अभियांत्रिकीची पदवी, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशीही माहिती प्राचार्य डॉ. जैन यांनी दिली.
स्वागत ताथवडे संकुल संचालक रवी सावंत यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. कविता मोहोळकर व प्रा. अमरीश क्षीरसागर यांनी कले. उपप्राचार्य प्रा. अविनाश देवस्थळी यांनी आभार मानले.


















