- गार्डन पूर्वरत करून, देखरेखीसाठी ठेकेदाराची नियुक्ती करा – संदीप काटे…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२०) :- पिंपळे सौदागरच्या कोकणे चौक ते स्वराज गार्डन दरम्यान पावणेदोन किलोमीटर परिसरात पिंपरी चिंचवड महापालिकेने लिनिअर गार्डन उभारले आहे. स्थानिक नगरसेवकांच्या वाटणीमुळे कोकणे चौक ते गोविंद चौक दरम्यानचे ‘गार्डन’ सुस्थितीत आहे. मात्र, विश्वशांती कॉलनी गावठाण लगत विकसित केलेल्या ‘लिनिअर गार्डन’मध्ये अवकळा पसरल्याचे चित्र आहे. गेल्या आठ महिन्यांपासून महापालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष झाल्याने या ‘गार्डन’ची दुर्दशा झालेली आहे. ‘गार्डन’मध्ये जागोजागी कचरा, अस्वच्छता, पाण्याअभावी जळून गेलेली रोपटे, वाढलेले गवत यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. उन्हाळा असूनही या ‘गार्डन’ चा नागरिकांना फायदा होत नाही. त्यामुळे महापालिकेने विश्वशांती कॉलनी गावठाण लगत विकसित केलेले ‘लिनिअर गार्डन’ पूर्वरत करावे. त्याच्या देखरेखीसाठी ठेकेदाराची नियुक्ती करावी, अशी मागणी पिं. चिं. शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात काटे यांनी म्हटले आहे की, पिंपळे सौदागर हा शहरातील सर्वाधिक वेगाने विकसित झालेला परिसर आहे. या भागातील प्रशस्त रस्ते, सोयीसुविधांचे शहराच्या अन्य भागातील नागरिकांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. त्यामुळेच पिंपरी चिंचवड महापालिकेने वैविध्यपूर्ण संकल्पनांवर आधारित पर्यावरणपूरक ‘लिनिअर अर्बन गार्डन’ची पिंपळे सौदागर परिसरात उभारणी केली. कोकणे चौक ते गोविंद चौकापर्यंत विस्तारलेल्या या ‘गार्डन’ चा परिसरातील नागरिकांना फायदा होताना दिसून येत आहे. स्थानिक नगरसेवकांची देखील हे ‘गार्डन’ अत्याधुनिक पद्धतीचे कसे होईल? यासाठी चढाओढ दिसते.
महापालिकेने काही दिवसांपूर्वीच कोकणे चौक ते गोविंद चौकाच्या नियोजित उर्वरित मोकळ्या जागेवर विस्तारित ‘लिनिअर गार्डन’ विकसित केले. त्यामध्ये पदपथ, विजेचे खांब, विसाव्यासाठी टेंट, वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून पाण्याअभावी येथील झाडा-फुलांची रोपटे जळून गेली आहेत. ‘गार्डन’मध्ये वाळलेले गवत, कचरा, जनावरांचे मलमूत्र, विष्ठा त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील स्थानिक नगरसेवकांच्या वाटणीमुळे महापालिकेने काही कोटींची उधळपट्टी करून, विकसित केलेल्या या ‘गार्डन’ची लवकरच कचराकोंडी होऊ नये, त्यासाठी महापालिका आयुक्तांनी त्वरित पाऊले उचलावीत. ‘गार्डन’मध्ये स्वच्छता, लावलेल्या वृक्षांच्या रोपट्यांना पाणी द्यावे, हिरवळीसाठी प्रयत्न करावेत. मुलांना खेळण्यासाठी साहित्य उपलब्ध करावे, लाकडी खुर्च्या बसवाव्यात व ‘गार्डन’ च्या देखरेखीसाठी ठेकेदाराची नियुक्ती करावी, असे या पत्रकात काटे यांनी म्हटले आहे.


















