- अरविंद एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मार्च) :- विद्यार्थ्यांना गणितातील वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान व्हावे, तसेच केवळ पुस्तकी म्हणजेच सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञानही मिळावे, या उद्देशाने जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात सांकेतिक आठवडे बाजार भरविण्यात आला. या बाजारातून विद्यार्थ्यांना वजन व मापांची माहिती मिळण्यास मदत झाली.
या बाजाराचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरूणकर, हर्षा बाठिया, मधू दाणी, तेजल कोळसे पाटील, श्रद्धा देशमुख, नीलिमा नायडू आदी उपस्थित होते.
या बाजारात प्रत्यक्ष पण सांकेतिक स्वरूपात खरेदीही करतात. पालेभाज्या, फळभाज्या, फळे, तसेच दैनंदिन व्यवहारात लागणाऱ्या वस्तू विद्यार्थी, शिक्षकांनी घेतल्या. यामुळे विद्यार्थ्यांना पाव, अर्धा किलो, एक किलो, डझन अशा वजन व मापांची माहिती मिळाली. पैशांचे आदान-प्रदान करणेही मुलांना शिकता आले. या बाजाराचे नियोजन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिक्षिका स्मिता बर्गे, स्वाती तोडकर, ज्योती मोरे, सविता देशमुख, नीलम मेमाणे यांनी केले.
आरती राव यांनी सांगितले, की विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळण्यास मदत होते. या अनोख्या प्रयोगामुळे विद्यार्थी लवकर व विशेष रुची घेऊन शिकतात. सोबतच गणित विषयाशी संबंधित अन्य व्यावहारिक ज्ञानही त्यांना मिळण्यास मदत झाली











