भोसरीतील ११० पीएमपीएमएल चालकांच्या थकित वेतनाचा प्रश्न सोडवा..
अन्यथा खळखट्याकला तयार रहा; मनसे शहराध्यक्षांचा आयुक्तांना इशारा…
पिंपरी (दि. ३०. जुलै. २०२०) :- भोसरीतील ११० पीएमपीएमएल चालकांचे थकित वेतन व त्यांच्या विविध मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेत, मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, मनसे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी कामगार सरचिटणीस सचिन गोळे, भोसरी मतदारसंघाचे अध्यक्ष अंकुश तापकीर यांच्यासह महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर माई ढोरे यांची भेट घेतली. महापालिकेने चालकांच्या तक्रारी, समस्यांबाबत सविस्तर तोडगा काढावा व तात्काळ पीएमपीएमएल चालकांचे वेतन अदा करावे, अशी मागणी त्यावेळी केली. मागणी मान्य न झाल्यास खळखट्याकचा इशाराही देण्यात आला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी म्हटले आहे की, एकीकडे करोनासोबतच्या लढ्यात अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) भोसरी आगारातील ११० चालक, कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा बजावत असताना, दुसरीकडे जुलै महिना संपत आला, तरी त्यांना अद्याप चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. लॉकडाउनमुळे आर्थिक नुकसान झाल्याचे कारण पुढे करून पीएमपीएमएल प्रशासन हात झटकाऊ कारभार पुढे करीत आहे. त्यामुळे भोसरी आगारातील ११० पीएमपीएल चालकांमध्ये कमालीची नाराजी आहे. वेतनाचा हा तिढा कायम असतानाच या चालकांना देखील करोनाचा विळखा बसत असल्याने त्यांच्यात आणखीनच चिंता वाढत आहे. पगारच नाही तर खायचे काय, जगायचे कसे आणि आजाराने गाठले, तर उपचाराला पैसे आणायचे कुठून, याची चिंता या पीएमपीएमएलच्या चालक, कर्मचाऱ्यांमध्ये सतावत आहे.
शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. महापालिकांमध्ये वैद्यकीय सुविधांची वानवा आहे. महापालिकेच्या रुग्णालयांत अपुऱ्या सुविधा असल्याने खासगी रुग्णालयात उपचार करावे लागत आहेत. तेथेही वाटेल तसे शुल्क आकारण्यात येत आहे. आजारपणात गाठीला पैसे आवश्यक असतात. मात्र आधीच तुटपुंजा पगार, तो ही अद्याप मिळालेला नसल्याने थकलेल्या कर्ज हफ्त्यांची चिंता डोक्यावर आहे. अशा स्थितीत करोनाने गाठले, तर काय करायचे याची चिंता कर्मचाऱ्यांना आहे. या पार्श्वभूमीवर, पालिकेचे आयुक्त व महापौर यांची भेट घेतली. तात्काळ पीएमपीएल चालक व कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतच्या व इतर समस्या सोडवा अन्यथा मनसे स्टाईलने खळखट्याकचा इशारा यावेळी देण्यात आला, असे या पत्रकात चिखले यांनी म्हटले आहे.
”पीएमपी चालकांच्या वेतनाबाबत विविध तक्रारी, समस्या याबाबत महापौर व आयुक्तांशी सविस्तर चर्चा झाली. चालकांचा हा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. येत्या चार ते पाच दिवसात पीएमपीएलच्या व्यवस्थापनाशी बैठक घेऊन वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन पालिका आयुक्त व महापौरांनी दिले आहे”.
– सचिन चिखले (मनसे शहराध्यक्ष तथा गटनेता)…