न्युज पीसीएमसी नेटवर्क : वेल्स :आपल्या मुलीला अभ्यासात ‘ढ’ समजून तिला प्रत्येक विषयात टॉपवर येण्याचे आव्हान देणाऱ्या वडिलांना तिने सुखद धक्का दिला. त्या मुलीने ती अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली. मुलीने आव्हान पूर्ण केल्यामुळे वडिलांना सुमारे सव्वा लाख रुपयांचे कर्ज काढावे लागले. ब्रिटनमधील वेल्स या शहरात घडल्या घडनेची साऱ्या जगभर चर्चा आहे.
वेल्समध्ये राहणारे क्लाइव रोलँड यांची मुलगी मौली अभ्यासात खूपच सुमार होती. इतर गोष्टींमध्येही तिची चूणूक जाणवत नव्हती. त्यामुळे ती ‘ढ’ असल्याचा कुटुंबीयांचा समज झाला. तिची कामगिरी सुमार असल्याचे शाळेने तिच्या नववीच्या प्रगतीपुस्तकात नमूद केले होते. खूप प्रयत्न करून आणि तिला शिकवणी लावूनही तिची काहीच प्रगती होत नव्हती. तिच्या वडिलांनी तिने प्रत्येक विषयात अव्वल कामगिरी केल्यास प्रत्येक विषयाला 100 युरो देण्याचे आव्हान तिच्यासमोर ठेवले. तिने आणि कुटुंबीयांनी गंमत समजून हा विषय सोडून दिला. मात्र, गंमत म्हणून हा विषय अनेकदा घरात निघू लागला. त्यावरून मौलीला चिडवणे आणि टोमणे मारणे असे प्रकार सुरू झाले. सुरुवातीला या प्रकारामुळे मौलीला नैराश्य आले. मात्र, या उपेक्षेलाच तिने प्रेरणास्रोत मानत वडिलांना आपण त्यांचे आव्हान स्वीकारत प्रत्येक म्हणजे 14 विषयात टॉप करणार असल्याचे सांगितले आणि वादा केल्याप्रमाणे 1400 युरो तयार ठेवण्यास सांगितले. तिने जेव्हा हे चॅलेंज स्वीकरले तेव्हा घरातील सर्वजण तिच्यावर हसले होते.
मौलीचा दहावीचा निकाल आल्यानंतर याच हास्यकल्लोळाचे रुपांतर आनंदाश्रूत झाले. मौलीने सर्वच्या सर्व 14 विषयात ए प्लस श्रेणी मिळवली होती. गेल्या अनेक वर्षात मौलीसारखे गुण कोणालाच मिळाले नसल्याचे सांगत शाळेनेही तिची पाठ थोपटली. मौलीला जास्तीत जास्त दोनतीन विषयात टॉप करता येईल अशी अपेक्षा होती. मात्र, तिने सर्वांचे अंदाज चुकवत मला कर्जबाजारी केल्याचे क्लाइव यांनी सांगितले. मुलीला केलेला वादा पूर्ण करण्यासाठी क्लाइव्ह यांना 1400 युरो म्हणजे सुमारे सव्वा लाखांचे कर्ज काढावे लागले. ते फेडण्यासाठी त्यांना एक वर्ष लागणार आहे. मात्र, हे आनंदाचे कर्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
नेहमीच्या टोमण्यांना वैतागल्यामुळे रागानेच आव्हान स्वीकारले होते. इरेला पेटून अभ्यास सुरू केला. खूप प्रयत्न केल्यानंतर अभ्यासाची आवड निर्माण झाली आणि प्रत्येक विषय सोपा होत गेला. परीक्षा देताना कोणताही तणाव किंवा नैराश्य नव्हते. त्यामुळे निकालापूर्वीच मी टॉप केले होते असे मौलीने सांगितले. वडिलांनी दिलेल्या पैशातून पुढील वर्षांचा अभ्या सुरू केल्याचे मौलीने सांगितले.
















