न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ एप्रिल २०२०) :- कोरोना (कोविड -१९) या विषाणूच्या प्रादुर्भावास अटकाव व्हावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने देशभर लॉकडाउन लागू केले आहे. त्यामुळे देशासह राज्यातील आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा व महाविद्यालये बंद आहेत. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या अनुषंगाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) १. एप्रिल. २०२० रोजी देशातील विविध वर्गातील विद्यार्थी आणि पालकांना अभ्यासाच्या भेडसावणाऱ्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी, सर्व शाळा व्यवस्थापनाला टीव्ही, यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि इतर ऑनलाईन माध्यमांचा वापर करून, ऑनलाईन वर्ग सुरू करण्याबाबत अधिकृत निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे अभ्यासक्रमाचे नवीन सत्र सुरू झाले आहे. मात्र, या ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना पुस्तकांची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत २०-२५ दिवस अभ्यासाशिवाय सुटणे शक्य नाही. लॉकडाऊन असल्यामुळे सर्व पाठ्य पुस्तकांची दुकानं बंद आहेत. विद्यार्थ्यांपुढे बाजारातून कॉपी बुक खरेदी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा दुहेरी कात्रीत विद्यार्थी अडकले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात आणि महापालिका आयुक्तांनी पिंपरी चिंचवड शहरात पाठ्यपुस्तकांच्या दुकानांना लॉकडाऊनमधून वगळावे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदी करण्यासाठी शहरातील दुकानं उघडी ठेवण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी पिंपळे सौदागरमधील चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवडसह देशभरात सीबीएसई शाळांकडून १ एप्रिलपासून ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सीबीएसईने मुलांच्या उन्नतीसाठी ई-स्कूल तयार केले आहे. विद्यार्थ्यांसाठी थेट आणि व्हिडिओ वर्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व शाळा ऑनलाइन वर्गांसाठी टीव्ही, यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि इतर ऑनलाईन माध्यमांचा वापर करीत आहेत. सीबीएसई बोर्डाच्या कोणत्या विषयाचा वर्ग कोणत्या वेळेत घेण्यात येईल आणि कोणता धडा शिकविला जाईल, याबाबत शाळा व्यवस्थापन मोबाइलवर किंवा ईमेलद्वारे संदेश पाठवून आपल्या विद्यार्थ्यांना माहिती देत आहेत. शाळा फोन इन प्रोग्राम, स्टुडिओ क्लासद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवीत आहेत. एखादा विद्यार्थी ऑनलाईन वर्गास उपस्थित राहू शकत नसेल त्याला यूट्यूब हे माध्यम आहे. मात्र, यामुळे पालकांची जबाबदारी वाढत आहे. कारण दररोज त्यांच्या मोबाईलवर क्लासेसचे व्हिडिओ पाठवले जातात. गृहपाठ पूर्ण करून घेण्यासाठीही ते जबाबदार आहेत, असेही काटे यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे फारसे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना ऑनलाइन वर्ग दिले जात आहेत. टेक्स्ट बुक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्ग संपल्यानंतर रिव्हिजनसाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच विषय समजून घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्यांकडे एकच पर्याय शिल्लक आहे, एनसीईआरटी वेबसाइटवरून पुस्तके डाउनलोड करणे. मात्र, काही मुलांवर याचा अतिरेक होताना दिसून येत आहे. तर काहींना सवयच नसल्यामुळे अभ्यास करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना टेक्स्ट बुकची गरज भासू लागली आहे. तसेच एकदा शिकविलेला ऑनलाईन अभ्यासक्रम नंतर शिकविला जाणार नाही. त्यामुळे मुलांची अभ्यासाची गोची होत आहे. सारखे ऑनलाईन राहिल्यामुळे मुलांमध्ये डोळेदुखी, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी व इतरही अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत, अशा पालकांच्या देखील तक्रारी आहेत, असेही काटे यांनी म्हटले आहे.
या सर्व बाबींचा विचार करून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विद्यार्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने व ऑनलाईन शिकविलेला अभ्यासक्रम समजण्यास सोपा जावा, यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील पाठ्यपुस्तकांच्या दुकानांना लॉक डाऊनमधून सूट द्यावी, जेणेकरून मुलांमध्ये अभ्यासाविषयी गोडी निर्माण होईल, असे या पत्रकात संदीप काटे यांनी म्हटले आहे.


















